राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या छत्राखाली नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय परिषदेने ट्रान्स समुदायाला अभूतपूर्व अशी संधी उपलब्ध करून दिली होती. या व्यासपीठावरून आपण आपले हक्क, आपली मागणी आणि आपली वेदना ठामपणे मांडू शकलो असतो. परंतु एका क्षुल्लक शब्दप्रयोगामुळे निर्माण झालेल्या वादाने संपूर्ण वातावरण कलुषित केले आणि जी संधी ऐतिहासिक ठरू शकली असती ती आपल्या हातून निसटली.
एका ज्येष्ठ ट्रान्स कार्यकर्त्यांनी स्टेजवरून ट्रान्स पुरुषांना “बहिणी” असा संबोध केल्यावर झालेली तीव्र प्रतिक्रिया अनर्थकारक ठरली. कारण हो, ट्रान्स पुरुष हे पुरुषच आहेत. त्यांच्या ओळखीवर शंका घेणं म्हणजे त्यांच्या अस्तित्वालाच धक्का देणं होय. ही चूक झालेली खरी, पण तिच्या दुरुस्तीसाठी ज्या प्रकारे तत्काळ वादंग उभा राहिला त्याने केवळ व्यक्तिगत अहंकाराचं दर्शन घडवलं. सार्वजनिक व्यासपीठावर अंतर्गत मतभेद उघड करणं म्हणजे समुदायाच्या एकात्मतेला तडा देणं होय.
या प्रसंगाचा परिपाक अधिक गंभीर ठरला. मानवाधिकार आयोगाचे कार्यकारी अधिकारी श्री. भरत लाल यांनी केलेली तीव्र टीका, “तुमचा अहंकार प्रचंड आहे, तुम्हाला समाजासाठी काही करायचं नाही. पुढे आम्ही अशी परिषद बोलावणार नाही,” ही केवळ वैयक्तिक टिपणी नव्हती. ती संपूर्ण ट्रान्स समुदायाच्या सामूहिक प्रयत्नांवरच सावली टाकणारी ठरली. या एका वाक्याने भविष्यातील संवादाचे दरवाजे बंद होण्याचा इशारा दिला. आणि जर हे दरवाजे एकदा बंद झाले, तर पुन्हा उघडण्यासाठी कदाचित दशकांचा काळ लागेल.
सामाजिक अंगाने पाहिलं, तर आधीच उपेक्षित आणि उपहासाचा सामना करणाऱ्या ट्रान्स लोकांच्या प्रतिमेला या वादामुळे आणखी तडा गेला. समाज, जो आपल्याकडे नेहमी शंकेच्या नजरेने पाहतो, त्याला यानंतर असं वाटणं साहजिक आहे की आपण स्वतः एकसंघ नाही. राजकीय परिप्रेक्ष्यातून पाहिलं, तर ही परिषद आपल्या मूलभूत मागण्या, शिक्षणातील आरक्षण, आरोग्य हक्क, रोजगारातील समान संधी आणि कायदेशीर संरक्षण यांचा उहापोह करण्यासाठी होती. त्या सर्वच मागण्या गोंधळाच्या गर्तेत हरवून गेल्या. आणि भावनिक स्तरावर तर हजारो तरुण ट्रान्स व्यक्तींनी हा प्रसंग पाहून निराशेने विचार केला असेल, “आपले नेते जर अशा क्षणी एकत्र उभे राहू शकत नाहीत, तर आपल्यासाठी आशेचा किरण कुठे आहे?”
या घटनाक्रमातून धडा घेणं अत्यावश्यक आहे. समुदायामध्ये संवादाची साधनं उभारणं, वाद मिटवण्यासाठी संरचित यंत्रणा उभी करणं, आयोगाशी पुन्हा संपर्क साधून झालेल्या प्रकाराबद्दल खेद व्यक्त करणं आणि भविष्यातील अजेंडा ठामपणे ठेवणं ही पावलं उचलली पाहिजेत. फक्त सोशल मीडियावर एकमेकांच्या समर्थनार्थ व्हिडिओ किंवा पोस्ट करणं हा केवळ भावनांचा उद्रेक आहे. पण खरी राजकीय दिशा म्हणजे सामूहिक निवेदन देऊन आपलं ऐक्य प्रस्थापित करणं.
ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी केलेली चूक मान्य करणे महत्त्वाचे होते आणि दुसऱ्या कार्यकर्त्यांनी तो मुद्दा उचलून धरणे तेवढेच महत्त्वाचे होते. पण या दोन्ही कृतींचा पद्धतशीर परिणाम असा झाला की आपण स्वतःच स्वतःचं नुकसान करून घेतलं.
आपल्याला विसरता कामा नये की ट्रान्स पुरुष हे पुरुष आहेत, ट्रान्स महिला या महिला आहेत आणि नॉन बायनरी ओळखी वैध आहेत. ही सत्यं आपल्या अस्तित्वाच्या केंद्रस्थानी आहेत. या सत्यांचा पुरस्कार करण्यासाठी भांडण नव्हे तर संवाद, अहंकार नव्हे तर सहकार्य आणि फुटी नव्हे तर ऐक्य यांची आवश्यकता आहे.
आज प्रश्न फक्त एवढाच आहे की इतिहासात या प्रसंगाची नोंद कशी होईल. आपण या व्यासपीठावर एकसंघतेने उभे राहिलो, की एका चुकीच्या क्षणाने आपणास परस्परांत फोडून टाकलं.
हेही लक्षात घेणं आवश्यक आहे की अशा वादांचा परिणाम नेतृत्वाच्या जागी असलेल्या किंवा समाजात आधीच स्थिरावलेल्या कार्यकर्त्यांवर फारसा होणार नाही. त्यांचे स्थान टिकून राहील, त्यांचे नाव कायम राहील. पण रस्त्यावर अजूनही भिक मागणाऱ्या, मुख्य प्रवाहाच्या दारावर अजूनही टकटक करणाऱ्या, समाजाच्या कडेकडेने जीवन जगणाऱ्या आपल्या भावंडांसाठी या वादांचा दीर्घकालीन परिणाम फार गंभीर असेल. त्यांच्या संघर्षाची दारे अधिक बंद होतील आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होणं आणखीन कठीण होईल.
-सूरज राऊत
Recent Comments