वाट चुकलेला ‘Dangerous’ दिग्दर्शक- राम गोपाल वर्मा

राम गोपाल वर्मा हे भारतीय सिनेसृष्टीतील एक जानेमाने नाव! चित्रपट  दिग्दर्शक, पटकथा लेखक आणि चित्रपट निर्माते म्हणून त्यांनी निर्मिलेल्या कलाकृतीनी तेलगू आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर आपले नाव कोरले आहे. तसेच टीव्हीच्या चिमुकल्या चंदेरी पडद्यावरून जनमानसावर त्यांनी राज्य केलेले आहे. व्यावसायिक चित्रपटसृष्टीत यशस्वी कारकीर्द गाजवत असताना समांतर सिनेमा आणि डॉक्युमेंट्री फिल्म्स याही क्षेत्रात आपल्या तांत्रिक कौशल्याने आणि वास्तववादी चित्रणाने आपला आमिट ठसा उमटवला आहे. १९९० नंतरच्या दशकांवर अनभिषिक्त राज्य त्यांनी गाजवले. सत्या, भूत, सरकार, डरना मना हैं, डरना जरूरी हैं तसेच एक हसीना थी असे एकाहून एक बेहतरीन चित्रपट त्यांनी भारतीय सिनेसृष्टीला दिले. कृष्णधवल चित्रपटांच्या काळात रामसे बंधूचे जे स्थान होते तेच स्थान रोमांचकारी गूढ आणि भीती निर्माण करणाऱ्या चित्रपटांची निर्मिती करून राम गोपाल वर्मानी पटकावले आहे. भयपट निर्माण करताना त्यामधील व्यक्तिरेखांचा मानसशास्त्रीय उहापोहही त्यांनी केला आहे.

भारतीय सिनेसृष्टीत नवीन युगाचा अविष्कार करणाऱ्या महत्वाच्या सिनेदिग्दर्शकांमधे राम गोपाल वर्मा यांचे नाव आवर्जून घ्यावे लागेल. व्यावसायिक चित्रपट आणि प्रायोगिक चित्रपट या दोन्हींचा समन्वय साधण्याची दुर्लभ किमया त्यांच्या ठायी आहे. राम गोपाल वर्मांनी भारतीय राजकारणाचे विदारक चित्रण तसेच  मुंबईतील गुन्हेगारांचे अंडर वर्ल्ड  अत्यंत परखडपणे त्यांच्या चित्रपटातून रंगवलेले आहे. त्यांच्या सत्या (१९९८) सिनेमाची गणना  CNN-IBN ने सार्वकालीन सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपटात केली आहे. एक दशक उलटल्यानंतरही आजच्या युवा वर्गालागोली मार भेजे मेही धून थरारून टाकते. त्याचारक्त चरित्र‘ (२०१०) हा चित्रपट भारतीय सिनेसृष्टी जगतात उल्लेखनीय मानला जातो. मुंबईवरती पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचे चित्रण करणारा चित्रपट२००८ मुंबई अटॅक्सतसेच अटॅक्स ऑफ २६/११‘ (२०१३) चित्रपट महत्वाचे आहेत. दहशतवादी विरप्पन  वरील चित्रपटकिलिंग विरप्पन‘ (२०१६) हा तात्कालिक आणि सार्वकालीन दहशतवादावर भाष्य करणारा चित्रपट आहे.   ‘वंगावीती‘ (२०१६) या चित्रपटात विजयवाडा दंग्याचे चित्रण केलेले आहे.

हैद्राबादस्थित असणाऱ्या राम गोपाल वर्मा नावाच्या या सिव्हिल इंजिनिअरने तेलगू चित्रपट सृष्टीत एक नवीन पाऊलवाट निर्माण करणारा क्राईम थ्रिलरशिवा ‘ (१९८९) पडद्यावर आणला आणि त्याचा हा चित्रपट तेराव्या भारतीय आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टीवलमधे झळकला. या चित्रपटाने राम गोपाल वर्माला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा  फिल्म फेअर पुरस्कार मिळवून दिला. अर्थातच त्यामुळे या चित्रपटाचा समावेशही CNN-IBN च्या सर्वोत्कृष्ट शंभर चित्रपटांच्या यादीत झाला. राम गोपाल वर्माचा पुढचा चित्रपट होता  ‘क्षण क्षणम‘ (१९९१) हा चित्रपट ॲन आर्बर फिल्म फेस्टीवलमधे झळकला. या चित्रपटाने त्याला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट पटकथा लेखन याकरिता नंदी अवॉर्डचे मानकरी बनवले.१९९९ साली त्यांनी दिग्दर्शित केलेल्या प्रेमकथा या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचे नंदी अवॉर्ड प्राप्त झाले.

विजयवाडाच्या इंजिनिअरिंग कॉलेजमधे शिकत असतानाच राम गोपाल महाशय कॉलेज बुडवून सिनेमे पाहायला जायचे. सिनेमातील आवडलेली दृश्ये पुन्हा पुन्हा पाहण्यासाठी एकच सिनेमा अनेकदा ते बघायचे.

तहेलकाला दिलेल्या मुलाखतीत चित्रपट निर्माता होण्यामागील रहस्य राम गोपाल वर्माने उलगडले आहेते सांगतात कीमाझ्या पालकांच्या दृष्टीने मी एक वाया गेलेला मुलगा होतो आणि ते सत्यचं होतं कारण मला आयुष्यात ध्येय वगैरे काही न्हवतं. मला लोकांचे वर्तन न्याहळत बसणे आवडायचे. मी लक्षपूर्वक त्यांचे निरीक्षण करायचो. तसेच वर्गातील गुंड पोरांचं मला कुतूहल वाटायचं कारण त्या पोरांमधे इतरांना धुडकावून लावण्याची हिम्मत होती यामुळे मला ते हिरो वाटायचे. त्यातूनच प्रेरणा घेऊन समाजविघातक घटना आणि गुन्हेगारीचे अंडर वर्ल्ड मी माझ्या चित्रपटात निर्माण करू शकलो.

पोट भरण्यासाठी हताश होऊन नायजेरियाला जावं असे पण राम गोपाल यांनी ठरवले होते. पण त्यासुमारास त्यांनी हैद्राबादमधील एका व्हिडिओ लायब्ररीला भेट दिली आणि त्यांना त्यातून एक फिल्म बनवावी वाटली आणि नंतरसत्यासारखी फिल्म त्यांनी निर्माण केली. या चित्रपटाचा उदो उदो अनेक आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टीवल मधे चित्रपट समीक्षकांनी केला. कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये राम गोपाल वर्माचेसत्याआणि कंपनी हे चित्रपट पाहून ब्रिटिश दिग्दर्शक डॅनी बॉयल यांना स्लमडॉग मिलियोनेर हा चित्रपट निर्माण करायला प्रेरणा मिळाली. उर्मिला मातोंडकर या गुणी महाराष्ट्रीयन अभिनेत्रीला रंगीला या चित्रपटातून त्यांनी ब्रेक दिला. रंगीला ची गाणी आजही आबालवृद्धांमध्ये लोकप्रिय आहेत.

गुन्हेगारी जगाचे अत्यंत सह्यतपणे चित्रण करणाऱ्या राम गोपल वर्मा सारख्या विख्यात चित्रपट निर्माता आणि  दिग्दर्शकाचा नुकताच प्रदर्शित झालेला “Dangerous” हा चित्रपट अत्यंत निराशाजनक आहे. समलिंगी स्त्रियांमधील आर्त नाते रेखाटणारा फायर हा चित्रपट अत्यंत हळूवारपणे आणि कुशलतेने दोन स्त्रियांमधील लैंगिक, भावनिक आंदोलनाचे चित्रण करतो. मात्र राम गोपाल वर्माचा  Dangerous या चित्रपटात समलिंगी स्त्रियांच्या अनुभूतीला चित्रित करताना गुन्हेगारीचे भडक रंग देण्यात आलेले आहेत. याबद्दल सोशल मीडियावरून राम गोपाल वर्मा यांचा तीव्र शब्दात निषेधही केला गेला आहे. राम गोपाल वर्मा यांचे LGBT community संदर्भात गांभीर्याने शिक्षण केले जाण्याची गरज आहे. स्त्रियांचे समलिंगी संबंध या विषयावर चित्रपट काढण्याचा त्यांचा प्रयत्न प्रशंसनीय नक्कीच आहे परंतु या विषयाची हाताळणी भारतासारख्या देशात ज्या सहानभुतीने आणि संयमाने व्हायला हवी होती ती न झाल्यामुळे अनेकजणांनी या चित्रपटाचा निषेध केलेला आहे. अर्णव गोस्वामीने राम गोपाल वर्माच्या घेतलेल्या मुलाखतीनंतर हा चित्रपट चर्चेत आला. अर्थात या चित्रपटात काम करणाऱ्या अप्सरा रानी आणि नयना गांगुली या दोन्ही अभिनेत्रींना मनाचा मुजरा. भारतीय सिनेसृष्टीत एक नवीन पर्व निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. उत्कृष्ट चित्रपट हिंदी आणि तेलगू सिनेसृष्टीला बहाल करणाऱ्या राम गोपाल वर्मा हे आपला रस्ता सोडून नक्कीच बहकले आहेत का असा प्रश्न पडतो. दाक्षिणात्य चित्रपट मधे बॉक्स ऑफिस वर हिट होण्यासाठी भडक गडद चित्रण गुन्हेगारी जगताशी झालर लैंगिक दृश्यांचा अतिरेक हा मसाला वापरण्याची परंपरा आहे परंतु समलैंगिकतेच विषय हाताळताना राम गोपाल वर्मा नी तारतम्य आणि संयम बाळगायला हवा होता. समलैंगिकता या विषयावर चित्रपट तयार करणे म्हणजे डोळ्यात गेलेला काचेचा कण मोर पिसाने बाहेर काढण्या इतके कठीण काम आहे जे फायर चित्रपटाच्या दिग्दर्शकाने साधले आहे. राम गोपाल वर्मा यांना सद्बुद्धी लाभो आणि सजगपणे त्यांनी समलैंगिकता या विषयाकडे त्यांनी पहावे अशी अपेक्षा.


सुरज
राऊत

Written by Suraj Raut

Started in 2009 as a collective and now as Mist LGBTQ Foundation, Mist aims at empowering the LGBTQ+ community & promotes safe love by changing mindset through awareness.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!