किसी घर की यह भी कहानी…

मी विचार करतं सहज बसले होते. म्हातारपण आलं आहे हे कळत होतं. रिटायरमेंटनंतर कोणी फारसं ओळखीचंही सोबत नव्हतं जगण्याच्या मुख्य प्रवाहापासून बरीच तुटले होते .आत्तापर्यंत स्वतः बद्दल विचारही करता आला नाही असं काहीसं वाटत होतं. सहज बसल्या बसल्या फेसबुकवर वेळ घालवत होते. फेसबुकवर एक पोस्ट दिसली “Queer Nagar”. अरे वाह! हे काय आहे ? म्हणून वाचायला गेले. तेव्हा कळले हे तर LGBT संबंधीत काहीतरी आहे. आजकाल किती उघडपणे सर्वजण या विषयावर बोलतात.

मी कुंदा, वयवर्षे साठ. शाळेतून दहा वर्षांपूर्वी रिटायर झाले . माझं बालपण औरंगाबादमध्ये आणि कामाच्या निमित्ताने अहमदनगरमध्ये वास्तव्य .लहानपणी घरी सर्व व्यवस्थीत होतं. बाबा गावचे सरपंच होते आणि आई घर सांभाळायची. आई बाबांनी माझं डी.एड् .पर्यंत शिक्षण पूर्ण करून घेतलं होतं. वयाच्या एकविसाव्या वर्षी हातात नोकरीही होती. मला नगरच्या सरकारी शाळेत नोकरी मिळाली होती. पहिली ते चौथीच्या वर्गाना शिकवायचे. औरंगाबाद सुटलं आणि मी नगरला आले. जेव्हा मी इकडे आले तेव्हा तरुण होते, मनाने बालिश होते. सर्वात जास्त कौतुक याचं होतं की, घरच्यांनी नोकरी साठी एकटीला परगावी राहू दिलं होतं.

शाळेत नोकरी करत असताना अनेकदा लक्षात आलं की आपल्या वयाच्या मुलींचीं लग्न झालेली असून, त्यांच्या काखेत लेकरं आहेत. माझं नशीब की घरचे कधी लग्नासाठी माझ्या मागे लागले नाहीत.

मला अनेकदा लोकांनी विचारलं, “तुम्ही लग्न का केलं नाही बाई ? ” तेव्हा माझ्या जवळ उत्तर होतं, पण माझ्याकडे तेव्हाही हिम्मत नव्हती आणि आजही नाहीये. मला विचारणाऱ्या प्रत्येकाला मी सांगू शकले असते की ” मी समलिंगी स्त्री आहे. मला स्त्रियांबद्दल लैंगिक आकर्षण आहे.

लहानपणी म्हणजेच साधारण चौदा पंधरा वर्षांची असताना, शाळेची सहल गेली होती अजिंठा-वेरूळ, दौलताबादला. तेव्हा माझी ओळख झाली पार्वतीसोबत. पार्वती खूप गोड, प्रेमळ, देखणी होती. तिच्याशी बोलायला, तिच्यासोबत खेळायला मला खूप आवडत असे. मला तिची सोबत खूप आवडायची. पूर्ण सहलीमधे ती माझ्यासोबत होती. आम्ही सोबत हातात हात घालून चालताना गाणी गायचो. तिचं आणि माझं आवडतं गाणं होतं,

आगे भी जाने ना तू पीछे भी जाने ना तू
जो भी है बस यही एक पल है

नंतर कॉलेजात जातानाही पार्वती सोबत होती. तिच्यासोबत माझं कॉलेज लाईफ गेलं. ती सुंदर दिसायची. कॉलेजात सर्व लेक्चर्सला बसायची. छान आवरून यायची. ती आणि मी एकाच बाकावर बसायचे. ती नेहमी साडी नेसायची. ती साडीत खूपच सुंदर दिसत असे. तिच्यावरून मी कधीही नजर हटवू शकले नाही. ती, मी आणि आमची गाणी हे नातं आमचं घट्ट झालेलं होतं. मला ती आवडायला लागली होती. तिची सोबत नेहमी हवी हवीशी वाटू लागली होती. माझ्या वयाच्या मुलींना मुलं आवडायची आणि मला पार्वती. हे काहीसं मला पटत नव्हतं आणि समजतही नव्हतं. त्या काळात मी आणि पार्वती नेहमी हे गाणं गायचो,

दिल की बातों का मतलब न पूछो
कुछ और हमसे बस अब न पूछो,
जिसके लिये है, दुनिया दीवानी
या है मोहब्बत, या है है जवानी…

माझी नोकरी चालू झाली, पार्वतीपण माझ्यासोबत नगरला आली. तिने घरी लहान मुलांचे ट्युशन घेणे चालू केले. पार्वतीपण माझ्या प्रेमात होती. आम्ही छान राहत होतो. पार्वतीच्या हाताला चव होती, ती छान छान बनवून मला खाऊ घालायची. मी गोड पदार्थ छान करायचे. मी पण कधी शीरा तर कधी खीर असं बनवून तिला खाऊ घालायचे. साधारण आम्ही एक दोन वर्षे सोबत राहिलो. एकमेकींना आम्ही आवडू लागलो होतो. आम्ही एकमेकींच्या प्रेमात होतो. पण माझ्यात हिम्मत नसल्याने मी तिला विचारू शकले नाही. पण ती धाडशी होती. एक दिवस धाडसाने तिने मला विचारले. आपण आयुष्यभर सोबत राहू शकतो का ? मला तुझा सहवास खूप आवडतो. मग तर झालंच,

बातें कुछ अनकही सी,
कुछ अनसुनी सी होने लगी
क़ाबू दिल पे रहा ना

आम्ही आमच्या ओळखीच्या काही मैत्रिणींना आणि मित्रांना आमच्याबद्दल सांगितले. मित्रांनी आम्हाला खूप सहकार्य केले. पुढच्या दोन वर्षांनी आम्ही सर्व मित्रांच्या सहकार्याने अग्नीच्या साक्षीने आणि देवाच्या आशीर्वादाने लग्न केले. आमचा सुखाचा संसार सुरू झाला.
काही महिन्यांनी आमच्या घरी आमच्या लग्नाबद्दल कळले आणि दोघींच्या घरात खूप आकांडतांडव झाले. घरच्यांनी येऊन आमच्यासोबत खूप भांडणे केली . शेवटी आमच्याशी संबंध तोडले. यानंतर अनेक छोट्या मोठ्या परीक्षांना आम्हाला सामोरे जावे लागले. आम्ही दोघींनी नेहमी एकमेकींना साथ दिली आणि देत आहोत.

वयाच्या साठीत आम्ही दोघी हातात हात घेऊन एवढंच म्हणू शकतो ,

आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जुबा पर
सब को मालूम है और सबको खबर हो गयी

~Written by Suraj Raut

Started in 2009 as a collective and now as Mist LGBTQ Foundation, Mist aims at empowering the LGBTQ+ community & promotes safe love by changing mindset through awareness.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!